पुणे : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शक्य त्या ठिकाणी घड्याळ, तर गरजेनुसार तुतारी या चिन्हावर उमेदवार देण्यात येणार आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील बारामती आणि दौंड तालुक्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
बारामती तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या सहा जागांची मागणी शरद पवार गटाने केली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पैकी एकही जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे शरद पवार गट पुढे काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
🔸 कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
स्थानिक नेत्यांशी चर्चा केली असता, जागा न मिळाल्या तरीही अजित पवारांसोबतच राहणार असल्याचं नेते जाहीरपणे सांगत आहेत. मात्र खासगीत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं चित्र असल्याचं समोर येत आहे. दौंड तालुक्यातही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकही जागा शरद पवार गटाला देण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही नाराज कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
🔸 इंदापूर-पुरंदरमध्ये समन्वय
दरम्यान, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये शरद पवार गटाला समाधानकारक जागा दिल्याने त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
🔸 जुन्नरमध्ये घड्याळावर एकसंघ लढत
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांची जबाबदारी तुतारी चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आव्हान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
🔸 आंबेगावात तुतारी विरुद्ध घड्याळ
शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र तुतारी आणि घड्याळ अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तुतारीकडून निवडणूक लढवणारे देवदत्त निकम यांच्याशी समेट न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोणाचाही विजय झाला तरी फायदा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

0 Comments